प्लॅटिनम आणि प्लॅटिनम ज्वेलरी म्हणजे नेमकं काय ? | Platinum Jewelry information in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लॅटिनम म्हणजे नेमकं काय आहे ? Platinum (प्लॅटिनम) Jewelry काय ? सोने आणि चांदी पेक्षा प्लॅटिनम वेगळा कसा आहे ? प्लॅटिनम ज्वेलरी असली आहे की नकली हे कसे ओळखावे ? त्याची प्युरीटी म्हणजेच शुध्दता किती असते? या सर्व बाबींची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो, ज्याप्रकारे सोने, चांदी, तांबे इ. धातू आहेत, त्याच प्रकारे प्लॅटिनम सुद्धा एक प्रकारचा बहुमूल्य असा धातू आहे. प्लॅटिनम धातूला बहुमुल्य मानले जाते कारण तो सोन्यापेक्षा जास्त दुर्लभ आहे. या प्लॅटिनम धातूचा रंग हा पांढरा असतो. काही लोकं प्लॅटिनम आणि व्हाईट गोल्ड या दोघांना सारखेच समजतात. परंतु व्हाईट गोल्ड वेगळे आहे आणि प्लॅटिनम वेगळे आहे. व्हाईट गोल्ड वर पांढरा रंग चढवलेला असतो जो कालांतराने निघू शकतो. पण प्लॅटिनम हा ओरिजिनल पांढरा धातू आहे. त्याचा रंग कधीच उतरत नाही.
मित्रांनो, प्लॅटिनम ला जगात सर्वात मजबूत धातू म्हणून ओळखले जाते. कारण प्लॅटिनमचा मेल्टिंग पॉइंट हा १७६८ ℃ आहे. म्हणजेच १७६८ ℃ तापमानावरच तो विरघळतो. प्लॅटिनमच्या तुलनेत सोन्याचा मेल्टिंग पॉइंट १०६४ ℃ आहे. म्हणूनच खूप कमी ज्वेलर्स आहेत जे तुम्हाला प्लॅटिनम चे दागिने बनवून देऊ शकता.
या धातूची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅटिनम धातूचे दागिने वापरल्याने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होत नाही. जसे की काही लोकांना सोन्याचे व चांदीचे दागिने घातल्यावर पुरळ किंवा ऍलर्जी होते पण प्लॅटिनम चे दागिने घातल्यावर कुठल्याही प्रकारची ऍलर्जी वगैरे सारखे प्रकार होत नाही. एकंदरीत ज्या लोकांना सोन्या-चांदीचे दागिने घालता येत नाही त्यांच्यासाठी प्लॅटिनम एक चांगला पर्याय आहे.
या धातूची अजून एक खासियत अशी आहे की कधी कधी चांदीचे दागिने किंवा वस्तू काळाप्रमाणे वापरून वापरून काळी पडतात म्हणजेच ती ऑक्सीडाइज्ड होतात, पण प्लॅटिनम हा कधीही काळा पडत नाही, तो जसा आहे तसाच चमकत राहतो.
प्लॅटिनम हा रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय धातू आहे. त्यामुळे त्याला कधीही गंज लागत नाही. उच्च तापमाना मध्ये सुद्धा तो हवेतील ऑक्सिजनशी क्रिया करत नाही. म्हणजेच प्लॅटिनम या धातूवर हवा किंवा पाण्याचा काहीच प्रभाव पडत नाही. म्हणूनच हा एक मजबूत आणि टिकाऊ धातू आहे.
Platinum Purity
प्लॅटिनमची प्युरीटी / शुध्दता
काही लोक म्हणतात की प्लॅटिनम व व्हाइट गोल्ड एक सारखेच असतात परंतु व्हाईट गोल्डची शुद्धता ही फक्त 75 टक्के असते तर प्लॅटिनम ची शुद्धता ही 95 टक्के असते. म्हणजेच प्लॅटिनम ज्वेलरी बनवताना त्यात 95% प्लॅटिनम वापरले जाते.
मित्रांनो, ज्याप्रकारे सोन्या मध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट असते, तसेच प्लॅटिनम मध्ये Pt 950 असा हॉलमार्क असतो. म्हणजेच त्या वस्तू मध्ये 95 टक्के प्लॅटिनम वापरले गेले आहे असे ते दर्शवते.
मित्रांनो जेव्हा तुम्ही प्लॅटिनम ज्वेलरी खरेदी करतात जसे की अंगठी, कडा, चेन, ब्रेसलेट इत्यादी. म्हणजेच जेव्हा तुम्ही प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल ( Platinum Guild International) ची कोणतीही ज्वेलरी खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यासोबत एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर( Unique Identification Number) मिळतो जो त्या वस्तूवर दिलेला असतो व तोच नंबर तुम्ही घेतलेल्या दागिन्या सोबत मिळालेल्या सर्टिफिकेटवर सुद्धा लिहिलेला असतो. म्हणजेच तुम्हाला कळेल की हे सर्टिफिकेट त्याच दागिन्यांचे आहे आणि ते खरा आहे.
मित्रांनो, प्लॅटिनम हा सोन्या पेक्षा सुद्धा महाग धातू आहे. अनेक क्षेत्रांमध्ये प्लॅटिनम चा वापर हा कमी – जास्त प्रमाणात होत असतो त्यामुळे त्याची किंमत ही कधीही स्थिर नसते. कधीकधी प्लॅटिनम सोन्या पेक्षा सुद्धा जास्त महाग असतो.
Platinum Benefits
प्लॅटिनमचा उपयोग / फायदे
- मित्रांनो, प्लॅटिनम चा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. त्याच्या जास्त मेल्टिंग पॉइंट (Melting Point ) मुळे, शुद्धते मुळे व त्याच्या विश्वसनीयता या गुणांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये प्लॅटिनम चा उपयोग होतो.
- प्लॅटिनम चा वापर जास्त करून हिऱ्याचे दागिने बनविण्यासाठी केला जातो.
- तसेच प्लॅटिनम हे दातांवर उपचार करण्यासाठीही वापरतात. याशिवाय अनेक रासायनिक उद्योग, इलेक्ट्रिकल उद्योग, विमान उद्योग, प्रयोगशाळा ,औषधे , उपकरणे, लेझर उत्पादन यांसाठी प्लॅटिनम धातूचा वापर केला जातो.
- प्लॅटिनम चा उपयोग कम्प्युटरची हार्ड डिस्क बनवण्यासाठी सुद्धा होतो.
- याशिवाय प्लॅटिनम धातू चा उपयोग हा कॅन्सर सारख्या रोगावर औषध बनवण्यासाठी व केमोथेरपी साठी पण केला जातो.
- शिवाय उच्च गुणवत्तेची किमती चष्मे बनवण्यासाठी प्लॅटिनम चा उपयोग केला जातो.
- जहाजांना समुद्राच्या खारट पाण्यामुळे गंज लागू नये यासाठी जहाज बनवताना त्यात प्लॅटिनम चा वापर केला जातो.
- मित्रांनो, प्लॅटिनम चा 25 टक्के उपयोग हा दागिने बनविण्यासाठी होतो तर 75 टक्के उपयोग हा विविध उद्योगांमध्ये केला जातो.
प्लॅटिनम कोठे आढळते
जगात प्लॅटिनम उत्पादन करणारे देश खूप कमी आहेत, ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळ जवळ 75 टक्के उत्पादन हे साऊथ आफ्रिके मध्ये होते. याशिवाय रशिया, अमेरिका (USA), कॅनडा, झिम्बाब्वे येथे सुद्धा प्लॅटिनम चे उत्पादन केले जाते.
तर मित्रांनो, आज या लेखामध्ये आपण प्लॅटिनम धातू विषयी अधिक माहिती जाणून घेतली . त्याचा उपयोग, त्यांची विश्वसनीयता, त्याची किंमत या सर्व बाबी आपण पाहिल्यात, आशा आहे की तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.
धन्यवाद!