रोडियम प्लेटिंग म्हणजे काय ? | Rhodium Plated Jewelry
नमस्कार मित्रांनो, दागिने म्हटले की सगळ्यांचाच आवडता विषय. आपण जे दागिने घेतो मग ते सोन्याचे असो, चांदीचे असो, व्हाईट गोल्ड किंवा प्लॅटिनम चे असो प्रत्येक दागिना हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण ते खूप महाग असतात, म्हणून आपण त्याची व्यवस्थित देखरेख करतो, काळजी घेतो. मग या दागिन्यांबद्दल आपल्याला सगळी माहिती ही हवीच.
मित्रांनो, आपण जे दागिने वापरतो त्या दागिन्यांवर उठून दिसण्यासाठी किंवा त्यांची चमक वाढवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या धातूंचे प्लेटिंग किंवा पॉलीश केलेली असते. ज्यामुळे तो दागिना गंजत नाही किंवा खराब होत नाही.
ज्या धातूचे दागिन्या वर प्लेटिंग केले जाते तो धातू म्हणजे रोडियम (Rhodium). आजच्या लेखात आपण याच रोडियम प्लेटिंग बद्दल जाणून घेणार आहोत.
रोडियम प्लेटिंग म्हणजे काय?
Rhodium Polish or Rhodium Plating ( रोडियम प्लेटिंग )
मित्रांनो, रोडियम प्लेटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे दागिन्यां वर रोडियम नावाच्या पांढऱ्या धातूचे पातळ थर लावले जातात म्हणजेच प्लेटिंग किंवा पॉलिश केले जाते. जेणे करून ते दागिने खराब होऊ नये व त्यावर कसलेही ओरखडे पडू नये म्हणून त्या दागिन्या वर एक मोहक पांढरा रंग जोडला जातो. ही प्रक्रिया शक्यतो पांढर्या सोन्याच्या (व्हाईट गोल्ड) दागिन्यांवर केली जाते. परंतु चांदी, सोने आणि इतर मौल्यवान धातूंसाठी देखील हे रोडियम प्लेटिंग वापरले जाते.
रोडियम हा प्लॅटिनमच्या फॅमिली मधील एक मौल्यवान धातू आहे, ज्यामध्ये इतरही धातूंचा समावेश होतो. या धातूची किंमत ही सोन्यापेक्षाही खूप जास्त असते. रोडियम हा सर्वात महागडा मौल्यवान धातू तर आहेच शिवाय रोडियममध्ये उत्तम प्रकाश परिवर्तीत करणारे गुणधर्म सुद्धा आहेत.
रोडियम प्लेटिंगचे फायदे आणि तोटे
मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच दोष ही असतात. रोडियम प्लेटिंगच्या बाबतीत पण असेच काही आहे. रोडियम प्लेटिंग किंवा पॉलिशिंग करण्याचे फायदे बरेच आहे. पण त्याची प्रकिया करणे महाग असू शकते. चला तर रोडियम पॉलिशिंग चे आधी फायदे बघुयात.
फायदे
Rhodium Plating Benefits
- मित्रांनो, रोडियम प्लेटिंगचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे त्याचे दीर्घायुष्य. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या दागिन्याला रोडियम प्लेटिंग करता तेव्हा ते त्या दागिन्याला खराब होण्यापासून, स्क्रॅचेस किंवा ओरखडे पडण्यापासून वाचवते.
- तसेच रोडियम हा धातू हायपो अलर्जेनिक असल्याने हे निकेल सारख्या इतर हानिकारक धातूं पासून त्वचेचे रक्षण करते. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्या धातूची एलर्जी असेल तर रोडियम प्लेटिंग मुळे त्वचेला खाज सुटणार नाही किंवा रॅशेज होणार नाहीत.
- याशिवाय, रोडियम उत्तम प्रकारे प्रकाश परावर्तित करतो म्हणून रोडियम प्लेटिंग केल्याने तुमच्या दागिन्यांची चमक वाढून त्याचे रूप अजूनच आकर्षक दिसते.
दोष
- रोडियम प्लेटिंगचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्याची किंमत. रोडियम धातू सोन्या पेक्षा दुप्पट महाग असल्या मुळे, तुमच्या खिश्या वर थोडा ताण येऊ शकतो.
- शिवाय जर तुम्हाला तुमचे दागिने बदलायचे असतील तर तुम्हाला आणखी खर्च करावा लागु शकतो.
- रोडियम प्लेटिंगची जाडी किती असावी ?
- मित्रांनो, रोडियम प्लेटिंगची जाडी ही शक्यतो 0.75 ते 1.0 मायक्रॉन असायला हवी. अंगठ्या, कानातले, पेंडेंट आणि इतर दागिन्यांसाठी ही जाडी पुरेशी मानली जाते.
- खरंतर रोडियम प्लेटिंग जाड असेल तर ते दागिन्या वर कुठल्याही प्रकारचे क्रॅक होऊ देत नाही. पण जर रोडियम प्लेटिंग खूप पातळ असेल, तर त्यामुळे तुमच्या दागिन्यांचा रंग खराब होऊ शकतो.
रोडियम प्लेटिंग किती काळ टिकते ?
मित्रांनो, रोडियम प्लेटिंग किती काळ टिकू शकते हे रोडियम कोणत्या प्रकारच्या दागिन्यांवर लावले जाणार आहे यावर अवलंबून असते. जर तुम्ही नेकलेस आणि कानातल्यांसाठी, रोडियम प्लेटिंग करत असाल तर ते प्लेटिंग कायमचे किंवा दीर्घ काळापर्यंत टिकू शकते. परंतु जर तुम्ही दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांसाठी रोडियम प्लेटिंग करणार असाल तर शक्यतो एक वर्षानंतर तुमच्या दागिन्या वर लावलेले कोटिंग निघून जाऊ शकते.
उदाहरण द्यायचे झाले तर, समजा तुमच्या कडे एक अंगठी आहे जी तुम्ही रोज घालता, तर वारंवार हात धुणे, ताट किंवा भांडी धुणे, विविध दैनंदिन क्रियांमुळे दागिन्यावर वस्तूंचे घर्षण होऊन हे रोडियम प्लेटिंग किंवा रोडियम पॉलिशिंग खराब होऊ शकते.
- याशिवाय टॉर्चच्या प्रखर उष्णते मुळे सुद्धा रोडियम प्लेटिंगचे आयुष्य कमी होऊ शकते.
- तसेच रोडियम प्लेटिंगची जाडी किती आहे आणि मूळ धातूचा रंग काय आहे यावर सुद्धा रोडियम प्लेटिंग किती काळ टिकेल हे अवलंबून असते.
- जर मूळ धातू पिवळ्या रंगाचा असेल, तर बारा महिने पूर्ण होण्यापूर्वी सुद्धा रोडियम प्लेटिंग निघून जाण्याची शक्यता असते.
- तसेच कधी कधी रोडियम प्लेटेड दागिने परिधान करणार्या व्यक्तीची बॉडी टोन या रोडियम कोटिंग वर परिणाम करू शकते.
रोडियम प्लेटिंग दागिन्यांची काळजी कशी घ्यावी
- मित्रांनो, तुमच्या दागिन्यांची रोडियम प्लेटिंग जास्त काळ टिकवायची असेल तर दागिने घातल्या वर पाण्याशी कमीत कमी संपर्क ठेवा.
- तुमचे दागिने कुठल्याही केमिकलच्या संपर्कात आणणे टाळा. किंवा कोणतेही केमिकल हाताळताना तुमचे दागिने काढुन ठेवा किंवा रबरचे हातमोजे घाला.
- पोहताना तुमचे दागिने काढून टाका कारण पाण्यात असलेल्या क्लोरीन मूळे प्लेटिंगला नुकसान होऊ शकते.
- तुमचे परफ्यूम किंवा इतर सौंदर्य प्रसाधने देखील रोडियम प्लेटिंग वर परिणाम करू शकतात. त्यामुळे त्यांची स्वच्छता ठेवा.
- वेळोवेळी कॉटन ने दागिने पुसून काढा.
तुमचे दागिने रोडियम प्लेटेड आहेत की नाही हे कसे सांगता येईल
मित्रांनो, व्हाईट गोल्ड म्हणजे पांढरे सोने हे त्याच्या मूळ स्वरूपात पिवळसर रंगाचे असते. म्हणूनच जर तुमच्या कडे पांढरे सोने असेल तर ते रोडियम पॉलिश केलेले असतील. कारण शक्यतो पांढर्या सोन्याचे सर्व दागिने रोडियम प्लेटेड असतात. त्याशिवाय, दागिन्यांच्या डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा तो दागिना रोडियम प्लेटेड आहे की नाही हे नमूद केलेले असते.
याशिवाय तुमचा दागिन्यांत सोने किती वापरले गेले आहे हे दर्शवण्यासाठी त्या दागिन्यावर 14 कॅरेट किंवा 10 कॅरेट असा शिक्का असेल. जर तुम्हाला हा शिक्का दिसला आणि जर तो दागिना चांदीच्या रंगाचा असेल, तर तो दागिना रोडियम प्लेटेड आहे असे समजावे.
तर मित्रांनो, असे हे रोडियम प्लेटिंग किंवा पॉलिशिंग तुमच्या दागिन्यांना ओरखडे होण्यापासून किंवा खराब होण्या पासून वाचवणारा एक संरक्षक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो.
धन्यवाद!