MarathiSaree (साडी)

नऊवारी साडीचे विविध प्रकार व विविध डिझाइन्स

नमस्कार मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती ही खूप प्राचीन संस्कृती मानली जाते. आपल्या संस्कृतीत वेशभूषा व अलंकार सोबतच साड्यांना सुद्धा विशेष महत्व दिले जाते. विविध प्रदेशांमध्ये विविध प्रकारच्या साड्या घातल्या जातात. त्यातल्या त्यात नऊवारी साडीला महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य व आपली पारंपारिक साडी मानले जाते. आजकाल सहावारी साडी किंवा डिझायनर साडीची क्रेझ असली तरी बऱ्याच भागांमध्ये आजही स्त्रिया नऊवारी साड्या नेसतात. शहरांमध्ये सणावाराला मुली व स्त्रिया आवर्जून नऊवारी साडी घालतात. पण ही नऊवारी साडी म्हणजे नेमकं काय? तिला नऊवारी च का म्हणतात त्याचे प्रकार किती या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

नऊवारी साडी म्हणजे काय ?

मित्रांनो, नऊवारी साडी म्हणजे स्त्रीयांनी कमरे भोवती गुंडाळून नेसण्याचे, ना कापलेले, ना शिवलेले आयताकृती कापड. या साडीची लांबी नऊ-वार म्हणजे अंदाजे 8.5 मीटर असल्याने त्याला नऊवारी असे म्हटले जाते. ही नऊवारी साडी शक्यतो कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील स्त्रिया घालतात.

नऊवारी साडीचे विविध प्रकार व डिझाइन्स

Nauvari Saree Different Types and Designs Marathi

मित्रांनो, साधारणतः आपल्याला नऊवारी साडी फक्त इतकंच माहीत असतं. नऊवारी म्हणजे फक्त काष्टा काढणे असे आपण समजतो. पण असं नाहीये. नऊवारी साडीचे अनेक प्रकार आहेत. चला तर ते प्रकार आपण जाणून घेऊ



Nauvari Saree Different Types and Designs Marathi

ब्राह्मणी नऊवारी साडी

मित्रांनो, पूर्वीच्या काळात ब्राह्मणी नऊवारी साड्या लग्नाच्या वेळी अथवा सणावाराला नेसल्या जायच्या. ही नऊवारी साडी नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे. या नऊवारी साडीचा काठाकडचा भाग, वर कमरेला खोचायचा असतो. ज्याला ओचा असे म्हटले जाते. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा घोळदार ओचा. पूर्वीच्या स्त्रिया या ओच्या मध्ये बऱ्याच वस्तू ठेवत असे. शिवाय यामध्ये निऱ्यांचा घोळ सुद्धा जास्त असतो. या साडी मध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचे ‘केळं’ काढले जाते. पूर्वी यामध्ये पैसे ठेवले जायचे. ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरीही पोटऱ्यांचा काही भाग मात्र उघडा राहतो.

नऊवारी सिल्क

नववधूसाठी हल्ली सिल्क च्या नऊवारी साड्यांना खूप मागणी असते. या सिल्क साड्यांमध्ये पैठणी सिल्क नऊवारी साडी जास्त प्रमाणात वापरली जाते. याचे कारण म्हणजे ही नऊवारी साडी शरीराला अगदी चापून चोपून बसते. या नऊवारी सिल्क साडीचा पदर हा खांद्यावरून वर खाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा काढताना साडीचे दोन्ही काठ मधेमध येतील या तऱ्हेने काढला होतो. फार पूर्वी लावणीसाठी विशिष्ट काठापदराच्या साडीचा उपयोग केला जात होता. लावणीच्या वेळेस या प्रकारच्या नऊवारी साडीचा वापर जास्त होत असे.

पैठणी नऊवारी साडी

नववधूसाठी किंवा इतर कार्यक्रमात पैठणी ही प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती असते. बाजारात आज काल पैठणी शिऊनही दिली जाते. पैठणी नऊवारी साडी तुम्ही पेशवाई किंवा ब्राह्मणी पद्धतीने सुद्धा नेसू शकता. या पैठणी नऊवारी साडीवर जर उपरणे घेतले तर ती अजून उठून दिसते.

कॉटन ब्लेंड नऊवारी साडी

बऱ्याच स्रियांना शरीराला व्यवस्थित चिकटून राहणाऱ्या नऊवारी साड्या आवडतात. त्यासाठी कॉटन ब्लेंडच्या नऊवारी साड्या चांगल्या समजल्या जातात. या साडीला चांगले समजण्याचे अजून एक कारण म्हणजे जर अंगाला जास्त घाम आला तरी या साड्या तो घाम टिपून घेतात. कितीही घाई असली तरी ही साडी नेसायला खूप सोपी असल्यामुळे लवकर नेसून होते. ही साडी तुम्ही ब्राह्मणी किंवा पेशवाई पद्धतीने सुद्धा नेसू शकता. यामध्ये जास्त ब्राईट रंग नसतात. पण नेसल्या वर मात्र ही नऊवारी साडी खूप छान दिसते.

बिग बॉर्डर नऊवारी साडी

मित्रानो आज काल खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवारी साड्या वापरल्या जातात. काहींना छोटे काठ असलेल्या नऊवारी साड्या आवडतात तर काही जणांना मोठ्या अर्थात बिग बॉर्डर नऊवारी साड्या नेसायला आवडतात . त्यातल्या त्यात या बिग बॉर्डर नऊवारी साडीमुळे नवरीचे रूप अधिक चांगले उठून दिसते. ही साडी नेसताना तुम्ही डिझाईनर ब्लाऊज वापरले तर अजूनच चांगले. या नऊवारी साडी मध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. अगदी तुमची आवडती पैठणी नऊवारी साड्यांमध्ये सुद्धा अशा बिग बॉर्डर नऊवारी अधिक चांगल्या मिळू शकतात. या प्रकारच्या नऊवारी मध्ये सुद्धा साडीचा पदर हा एका सरळ रेषे मध्ये न काढता खांद्यावरून वर खाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो. यामुळे याचा काठ एका रेषेत समोर दिसतो. आजच्या तरुण स्त्री वर्गात बिग बॉर्डर नऊवारी साडीला जास्त पसंती दिली जाते.

पेशवाई नऊवारी साडी

पेशवाई नऊवारी साडी नेसण्याची पद्धत थोडीफार ब्राह्मणी पद्धती प्रमाणेच आहे. यात फरक फक्त एवढाच की पेशवाई नऊवारी साडीचा ओचा हा ब्राह्मणी नऊवारी साडी पेक्षा कमी असतो. तुम्हाला तर भरजरी साड्या आवडत असतील तर तुम्ही पेशवाई नऊवारी नक्की वापरू शकता. तसेच आता या प्रकारच्या नऊवारी साड्यांमध्ये अनेक बदल झाले आहेत.

कोल्हापुरी नऊवारी

या प्रकारच्या नऊवारी साडी मध्ये सहसा दोन काष्टा असतात. या साडीला डबल काष्टा असेही म्हटले जाते. अष्ट प्रकारच्या नऊवारी साड्या कोल्हापूर मधील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला नेसताना दिसतात. ही साडी शक्यतो गुढघ्या पर्यंत नेसली जाते.

सिल्क कोळी नऊवारी

नावा प्रमाणेच ही नऊवारी साडी कोळी समाजातील स्रिया नेसत असतात. ही साडी खूपच वेगळ्या पद्धतीन नेसण्यात येते. समुद्रामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी कोळी स्रिया ही नऊवारी साडी गुडघ्या पर्यंत नेसतात. ही साडी शक्यतो कोल्हापूरी पद्धतीनेही नेसतात. शिवाय या साडीला जास्त घोळ नसतो. साडी अगदी घट्ट अशी नेसली जाते. या साडीचा पदराचा भाग कमरेला गुंडाळला जातो आणि ब्लाऊज वर डिझाइन असलेली कॉटनची ओढणी घेतली जाते. शिवाय या कोळी नऊवारी साड्या शक्यतो कॉटनच्याच बनलेल्या असतात. या नऊवारी साड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांवर फुलांचे नक्षी काम जास्त प्रमाणात केलेले असते.

बॉलीवूड नऊवारी कलेक्शन

बॉलीवूड मध्ये नऊवारी साड्यांचे कलेक्शन बघायला गेलं तर खूप जोरदार आहे. बॉलीवूड नऊवारी साडी मध्येही खूप वैविध्य आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नऊवारी साड्यांचा उपयोग करण्यात येतो. काही गाण्यांमध्ये विशेषतः नऊवारी साडीचा उपयोग केलेला दिसून येतो. आताच नाही तर पूर्वी पासून बऱ्याच चित्रपटांमध्ये नऊवारी साडी अभिनेत्रींनी नेसलेल्या आहेत. जसे की ‘तान्हाजी’ किंवा ‘मणिकर्णिका’, ‘बाजीराव मस्तानी’ या सारख्या ऐतिहासिक चित्रपटातही विविध पद्धतीच्या नऊवारी साड्यांचा लुक आपल्याला पाहायला मिळतो.

कॅज्युअल कॉटन नऊवारी

काही स्रियांना भपकेबाज डिझाईनर नऊवारी साड्या नेसायला आवडत नाहीत. अश्या स्त्रीयांसाठी कॅज्युअल नऊवारी साडी बाजारात उपलब्ध आहेत. या प्रकारची नऊवारी साडी पटकन आणि सहज नेसता येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या साड्या जड नसतात. त्यामुळे ही साडी घातल्या वर वावरायला अगदी सहज व सोपे होते. तसेच ही साडी शरीराला चिकटून बसते त्यामुळे सुटण्याचे टेन्शन नसते.

रेडिमेड नऊवारी

काही स्रियांना घाई गडबडीत नेसलेली नऊवारी साडी सांभाळण्याची सवय नसते. अशा स्रियासाठी रेडीमेड नऊवारी साडी बाजारात उपलब्ध आहे. ही साडी तुम्हाला नेसावी लागत नाही. तर तुमच्या आवडी प्रमाणे तुम्हाला ती शिऊन घेता येते. त्यामुळे ही साडी घालणे सोपे होते व साडी नेसण्याचा तुमचा वेळ सुद्धा वाचतो. तरुण किंवा लहान मुली रेडिमेड नऊवारी साडी घेणे जास्त पसंत करतात.

डिझाईनर नऊवारी साडी

ज्याप्रकारे सहावारी साड्यांमध्ये डिझाईनर साड्या असतात त्याच प्रकारे डिझाईनर नऊवारी साड्या सुद्धा मिळतात. ज्यांना पारंपरिक किंवा पैठणी नऊवारी आवडत नाहीत. त्यांच्या साठी डिझाईनर नऊवारी साडी बाजारात उपलब्ध आहे. ही साडी शरीराला अतिशय चापून चोपून बसते. या साडीचा पाया कडच्या बाजूला कमी घोळ असतो. पूर्वी लावण्यां मध्ये पारंपरिक नऊवारी साडीचा उपयोग व्हायचा. पण आताच्या फॅशन नुसार डिझाईनर आणि सिंथेटिक साडीचा वापर केला जातो.

काष्टा साडी

काष्टा हे नऊवारी साडीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सगळ्यांनाच नऊवारी साडी नेसवता किंवा नेसता येते नाही. त्यासाठी खूप सराव करावा लागतो. बऱ्याच नऊवारी साडी नेसणाऱ्या शेतकरी महिला साड्या ह्या गुडघ्या पर्यंत नेसतात. अगदी जुन्या मराठी चित्रपटांमध्ये तुम्ही अभिनेत्रींना काष्टा नऊवारी साडी नेसलेली पाहिले असेल.

तर मित्रांनो, अशी ही महाराष्ट्राची शान असलेली नऊवारी साडी जर तुम्ही लग्नात घालणार असाल तर कोणत्या प्रकारची नऊवारी निवडावी हे आत्ता पासूनच ठरवा. त्यासाठीच हा आजचा लेख. आशा करते की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल.
धन्यवाद!