MarathiMaharashtrian Jewelry (महाराष्ट्रीयन दागिने)

लहान बाळांचे दागिने | Maharashtrian Baby Jewelry

नमस्कार मित्रांनो, दागिने म्हटले की आपल्या भारतीय संस्कृतीत त्याला एक अविभाज्य घटक म्हणून मानले जाते. मग ते दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे. स्त्री व पुरुष दोघांना घालण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे दागिने बाजारात उपलब्ध असतात. तसेच तुम्हाला माहीत असेल की लहान बाळांचे सुद्धा दागिने मिळतात.

मित्रांनो, बऱ्याच जणांना लहान बाळांचे दागिने असतात हे माहीत तर असत, पण ते कोणकोणते दागिने आहेत, त्यांची नावे काय आहेत हे माहीत नसते. आजच्या लेखात आपण लहान बाळाचे कोणते दागिने असतात, याच विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.

Maharashtrian Baby Jewellery

मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी बाळाचे अलंकार किंवा दागिन्याला बाळलेणं असेही म्हटले जाते. या बाळलेण्या मध्ये किंवा दागिन्यांमध्ये प्रामुख्याने मनगट्या, कडे (हातातले व पायातले), अंगठी, गोफ, साखळी, पैंजण, वाळे, करगोटा, पिंपळपान , तोरड्या , वगैरे गोष्टींचा समावेश होतो.

मित्रांनो, लहान बाळांच्या दागिन्यांची दुनिया ही वेगळीच असते. बाळांचे सर्वात पहिले दागिन्याशी संबंध येतो तो जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी.

पाचव्या दिवशी सटवाई पूजन किंवा जिवती पूजन केले जाते. ही जिवतीची प्रतिमा गोल किंवा बदामाच्या आकाराच्या पेंडेंट मध्ये कोरलेली असते. त्यांनतर एखाद्या काळ्या धाग्यात सोन्याची जिवती ओवून ती बाळाच्या गळ्यात किंचा हातात घातली जाते.



बाराव्या किंवा तेराव्या दिवशी बाळाचे कान टोचण्याची प्रथा आहे. बाळाचे कान हे शक्यतो सोन्याच्या तारेने टोचले जातात व कान टोचल्या वर घातलेली तार व्यवस्थित वळवली जाते जेणेकरून ती नंतर बाळाला टोचत नाही.

अश्या प्रकारे हळू हळू बाळाला एक एक करून दागिने घेतले जातात. त्यात खास करून बाळाच्या बारशाच्या वेळेला बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घेतले जातात.

त्यात मनगट्या, पैंजण , तोरडया, वाळे, अंगठी ,चैन, बाजूबंद, कडे ही दागिने येतात. यापैकी काही दागिने हे चांदीची असतात तर काही सोन्याची असतात. शक्यतो पायात चांदीचे दागिने घातले जातात. कारण चांदी थंड असल्याने पायातील उष्णतेस ती प्रतीरोध करते.

मनगट्या / बांगड्या

मनगट्या किंवा बांगड्या ह्या चांदीच्या किंवा सोन्याच्या सुद्धा असू शकतात. शक्यतो काळ्या मण्यांसोबत सोन्याचे मणी ओवले जातात व ते हातात घालतात. बांगड्या घेताना त्या गोल आकाराच्या व कमी डिझाइन असलेल्या घेतल्या जातात, जेणेकरून त्याच्या कडा बाळाला टोचणार नाहीत.

पैंजण

पैंजण हे शक्यतो एक पदरी व चांदीचे असते. त्याला घुंगरू सुद्धा लावलेले असतात. पैंजण शक्यतो साधे प्लेन म्हणजे कमी डिझाइनचे असते जेणेकरून बाळाला त्याचा त्रास होऊ नये.

तोरडया व वाळे

तर तोरडया व वाळे जाडजुड बनवलेले असतात. वाळे हे तांब्याचे किंवा पंच धातूचे सुध्दा असतात. कारण लहान मुलांच्या पायात असे तांब्याचे दागिने घालण्याची खूप जुनी पध्दत आहे. कारण तांबे शरीरातील उष्णता शोषून घेते.

हलव्याचे दागिने

तसेच याशिवाय जन्म झाल्यावर बाळाच्या पहिल्या संक्रातीला बोरन्हाण घातले जाते. ह्या प्रसंगी बाळाला छान तयार करून हलव्याचे दागिने घातले जातात.

वंश परंपरा

अंगठी, बाजूबंद व चैन सारखे दागिने आजी आजोबांकडून वंश परंपरा म्हणून आलेले असते. हे दागिने फक्त सण वाराच्या निमित्ताने बाळांना घातले जातात.

चांदीचे ताट

मित्रांनो, हे झाले बाळाच्या अंगावर घालण्याचे दागिने. मात्र बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर त्याला चांदीच्या ताटात जेवू घालावं व चांदीच्या ग्लासाने पाणी पाजावं असं म्हटलं जातं. या मगच कारण असे आहे की लहान बाळांना चांदीच्या ताटात जेवू घातल्यास किंवा चांदीच्या ग्लासाने पाणी पाजल्याने त्यांचा शारीरिक व मानसिक विकास हा चांगल्या प्रकारे होतो, तसेच अनेक आजारांपासून शक्यतो पोटाच्या आजारा पासून बाळाचे संरक्षण होते. याशिवाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो असे म्हटले जाते.

तर मित्रांनो, बाळाला सोबत करणारे असे हे दागिने बाळाच्या आणि तुमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण असतात जे जपून ठेवले पाहिजे. कारण हौसेने केलेल्या व घातलेल्या या दागिन्यांची दुनिया खूपच वेगळी असते. मोठे झाल्यावर हीच एक आठवण आपल्या बरोबर राहत असते.

धन्यवाद!