MarathiGold (सोने)

सोन्याचे विविध प्रकार – रोझ गोल्ड, ग्रीन गोल्ड, व्हाईट गोल्ड / Rose Gold, Green Gold, White Gold

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण सोन्याचे विविध प्रकार जाणून घेणार आहोत.

आपण जेव्हा दागिन्यांचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिले सोन्याचा विचार आपल्या मनात येतो. अनेक वर्षांपासून, सोन्याला सर्वात मौल्यवान धातू म्हणून ओळखले जाते. सोने हे त्याच्या शुद्ध स्वरुपात असलेला एक रासायनिक घटक आहे. त्याच्या शुद्ध स्वरुपात, तो एक तेजस्वी, पिवळा, मऊ, धातू आहे.

इतर धातूसोबत त्याची प्रक्रिया केली गेली आणि सोने हे दागिने म्हणून दैनंदिन वापरासाठी योग्य बनले. म्हणजेच, सोने हे शुद्ध स्वरूपात वापरता येत नाही, म्हणून त्याला वापरण्यायोग्य बनवण्यासाठी ते इतर मिश्र धातूंसोबत एकत्र केले जाते.

हे मिश्रधातू सोन्याचे नैसर्गिक स्वरूप बदलतात ज्यामुळे सोन्याचा रंग भिन्न दिसू लागतात. शुद्ध सोन्याला सहसा चांदी, तांबे, जस्त, पॅलेडियम आणि निकेल सह मिश्रित केले जाते. त्यामुळे त्याचे विविध प्रकार पडतात. जसे की रोझ गोल्ड, येल्लो गोल्ड, व्हाईट गोल्ड आणि ग्रीन गोल्ड. या सर्व प्रकारांची आपण सविस्तर माहिती बघूया.

Different Gold Types in India

Different Gold Types – Rose Gold, Yellow Gold, White Gold, Green Gold



रोझ गोल्ड (Rose Gold)

मित्रांनो, रोझ गोल्डला लाल सोने म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा धातू म्हणजे 100% सोने नाही. तर ते काही धातूंचे मिश्रण आहे. रोझ गोल्ड हे पिवळे सोने, तांबे आणि चांदीच्या धातूंचे एक प्रकारचे मिश्रण आहे. या मध्ये पिवळ्या सोन्यासोबत चांदी आणि तांबे एकत्र करून गुलाबी रंगाचे रोझ गोल्ड तयार केले जाते.

मित्रानो, रोझ गोल्ड चा इतिहास बघायचा झाला तर साधारणतः 19व्या शतकाच्या सुरुवातीला रशिया मध्ये रोझ गोल्डचा वापर केला होता, ज्याला रशियन गोल्ड म्हणून ओळखले जायचे. रोझ गोल्डने नंतरच्या काळात अधिक लोकप्रियता मिळवली आणि ते एंगेजमेंट रिंग्ज आणि विविध प्रकारच्या दागिन्यां मध्ये परिधान केले जाऊ लागले.

रोझ गोल्ड हे सोन्याचेच बनलेले असते, फक्त ते 100% सोने नसते. कारण 24 कॅरेट सोन म्हणजे 100 टक्के सोने हे मऊ असल्याने त्यापासून दागिने बनवता येत नाही. त्याला मजबूतपणा आणण्यासाठी त्यात इतरही काही धातू एकत्र करावे लागतात. रोझ गोल्ड मध्ये कॉपर म्हणजे तांब्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याला थोडा गुलाबी रंग येतो. म्हणूनच त्याला रोझ गोल्ड असे म्हटले जाते.

मित्रांनो, काही दागिने हवेतील रासायनिक प्रक्रियांमुळे आपली चमक गमावतात, पण रोझ गोल्डच्या बाबतीत असे काही घडत नाही. त्यांची चमक कधी कमी होत नाही किंवा ते गंजत पण नाहीत. उलट रोझ गोल्ड मध्ये तांब्याचा भाग असल्याने तो किंचित डार्क दिसू शकतो, पण हे असे होण्यास खूप वर्ष लागतात. याशिवाय रोझ गोल्डचे दागिने मजबूत असल्याने ते वर्षानुवर्षे टिकतात.

क्लासि आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही रोझ गोल्डचे दागिने इतर दागिन्यांसोबत घालू शकता.

ग्रीन गोल्ड (Green Gold)

मित्रांनो, सोन्या बद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहीती आहे. नैसर्गिक अवस्थेत सोने पिवळ्या रंगाचे असते. परंतु, सोने जरी त्याच्या शुद्ध स्वरूपात पिवळे असले तरी, त्याच्या मऊपणा मुळे दागिने बनवण्यासाठी त्याला पुरेसे मजबूत करणे गरजेचे असते. त्यामुळे सोन्याला इतर धातूं मध्ये मिसळले जाते. या मिश्रधातूं मुळे सोन्याचा मूळ रंग बदलतो.

हिरव्या सोने सुद्धा अश्याच प्रकारे बनवले जाते. सोन्याला चांदीसह एकत्रित केल्याने हिरवा रंग येतो. याला इलेक्ट्रम म्हणूनही ओळखले जाते. थोडक्यात काय तर हिरवे सोने म्हणजे शुद्ध पिवळे सोने आणि शुद्ध चांदीच्या मिश्रणातून तयार झालेला एक मिश्रधातू आहे. याशिवाय रिंगसाठी, सोने अधिक टिकाऊ व मजबूत बनवण्यासाठी कधीकधी निकेल किंवा जस्त सारखे कठीण धातू सुद्धा त्यात मिसळले जातात.

हिरवे सोने दागिन्यांना एक वेगळे रूप व रंग देण्यासाठी वापरले जाते. ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर हिरव्या सोन्याचे सुद्धा खूप उपयोग आहेत. पूर्वीच्या काळात पिण्याचे भांडे तयार करण्यासाठी हिरव्या सोन्याचा वापर केला जात असे. तसेच अनेक नाणी व नोबेल पारितोषिकांची पदके सुद्धा याच मिश्रधातू ची बनलेली असायची.

ग्रीन गोल्ड मध्ये काही दोष ही आहेत जसे की, ग्रीन गोल्डच्या दागिन्यांत चांदी असल्याने कालांतराने ते काळे पडू शकते. त्यासाठी त्या दागिन्याला परत पॉलिश करावे लागते. हिरव्या सोन्यात मजबूतपणासाठी त्यात निकेल व कॅडमिअम वापरले जाते, जे शरीराला हानिकारक धातू आहेत त्यामुळे एलर्जी होऊ शकते.

हिरव्या सोन्याची किंमत ही त्याची शुद्धता जी कॅरेट मध्ये मोजली जाते, तसेच त्यात मिसळलेले इतर धातूंची किंमत आणि आकार यासह अनेक गोष्टींवर अवलंबून असते. परंतु, हिरव्या सोन्याच्या दुर्मिळपणामुळे, काही हिरवे सोने अधिक महाग असतात.

येल्लो गोल्ड / पिवळं सोनं (Yellow Gold)

मित्रांनो, येल्लो गोल्ड म्हणजे पिवळं सोनं हे दागिन्यां मध्ये खूप प्रसिद्ध आहे. जास्त करून एंगेजमेन्ट रिंगसाठी पिवळं सोनं खूप लोकप्रिय आहे. दागिन्यांसाठी म्हणायचे झाले तर पिवळे सोने हे सामान्यतः शुद्ध सोन्याचे बनलेले असते. पण टिकाऊ पणा तसेच रंग मिळविण्यासाठी ते इतर पांढऱ्या धातू मध्ये मिसळले जाते. त्यामुळे पिवळ्या सोन्याचा रंग क्रीमी येल्लो होतो.

पिवळ्या सोन्याचा इतिहास बघायचा झालाच तर तो खूप जुना व प्राचीन आहे. पूर्वी संपत्तीचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून पिवळ्या सोन्याकडे बघितले जायचे.

पिवळे सोने वेगवेगळ्या वजनात म्हणजे कॅरेट मध्ये येते. जसे की 18 कॅरेट, 14 कॅरेट, 9 कॅरेट वगैरे…
24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याला कडकपणा, टिकाऊपणा येण्यासाठी त्यात इतर धातू एकत्र केले जातात. 14K किंवा 9K सारख्या कमी कॅरेट सोन्या मध्ये चांदी, पॅलेडियम, निकेल किंवा झिंक सारख्या धातूंना समाविष्ट केलेले असते. त्यामुळे सोन्याच्या पिवळेपणा वर परिणाम होतो.

18 कॅरेट म्हणजे 75 टक्के सोने वापरले गेले, 14 कॅरेट म्हणजे 58.3 टक्के सोने वापरले गेले व इतर मिश्रधातू, 9 कॅरेट म्हणजे 37.5 टक्के सोने वापरले गेले.

उदाहरण द्यायचे झाले तर, 18 कॅरेट सोन्याचा, 9 कॅरेट सोन्या पेक्षा अधिक पिवळा रंग असेल. कारण त्यात पिवळे सोने जास्त प्रमाणात वापरले गेले आहे. थोडक्यात काय तर सोन्याचे कॅरेट जितके जास्त असेल तितके सोन्याचे प्रमाण व पिवळे पणा जास्त असेल पण फक्त कॅरेट जेवढे जास्त तेवढा तो धातू कमी मजबूत असतो. म्हणूनच सोन्याला मजबूत करण्यासाठी त्याला इतर मिश्रधातूं सोबत जोडावे लागते. तसेच लग्नासाठी आणि एंगेजमेंट रिंगसाठी शक्यतो 18 कॅरेट किंवा 14 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

व्हाईट गोल्ड (White Gold)

मित्रांनो, व्हाईट गोल्ड म्हणजे पांढरे सोने. पांढरे सोने हे शुद्ध पिवळे सोने आणि इतर धातूंचे मिश्रण आहे, इतर धातू मध्ये पॅलेडियम, चांदी, निकेल, तांबे आणि जस्त हे धातू येतात. या सर्वांमुळे पांढऱ्या सोन्याला मजबूती येते आणि त्याला पांढरा रंग देते.

पांढऱ्या सोन्यात असलेले इतर मिश्रधातू कमी जास्त प्रमाणात पिवळसर दिसतात, त्यामुळे त्यावर रोडियम नावाच्या पांढऱ्या धातूचा पातळ थर दिला जातो.

मित्रांनो, पांढरे सोने सुद्धा बऱ्याच प्रमाणात टिकाऊ असते. परंतु त्याचा टिकाऊपणा हा त्याच्या शुद्धतेवर म्हणजेच कॅरेट वर अवलंबून असते.

पिवळ्या सोन्या सारखीच पांढऱ्या सोन्याची शुद्धता सुद्धा कॅरेट मध्ये मोजली जाते.

उदाहरणार्थ, समजा पांढर्‍या सोन्याची अंगठी 18 कॅरेटची आहे, म्हणजे ही अंगठी 75% सोन्याने बनलेली आहे आणि 25% इतर धातूंनी बनलेली आहे.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पांढर्‍या सोन्या मध्ये इतर धातू सोबत निकेल सुद्धा असते, त्यामुळे तुम्हाला त्याची एलर्जी होऊ शकते. ही एलर्जी होऊ नये यासाठी पांढऱ्या सोन्याचे दागिने जेव्हा झिजायला लागतात तेव्हा त्याचे रोडियमचे कोटिंग बदलावे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सोन्याचे वेगवेगळे प्रकार बघितले. आशा आहे की तुम्हाला आजचा लेख नक्कीच आवडला असेल.

धन्यवाद!