MarathiGold (सोने)Popular Post

सोने खरेदी करताना सोन्याची खरी किंमत कशी काढायची ? | Gold Price Calculation

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात काही न काही कारणां रून आपण सोने खरेदी करतो. पण दुसरीकडे बघितले तर सोन्याचे भाव पण कमालीचे महाग झालेले असतात. आता तर सोन्याचे दर पन्नास हजारांच्या सुद्धा वर गेलेले आहे. या वाढलेल्या दरामुळे लग्न असो, वाढदिवस असो किंवा इतर कार्य़क्रम किंवा साधं मुहूर्ताला सोने खरेदी करणे म्हणजे आपला खिसा पूर्ण रिकामा होणार हे निश्चितच असते.

अनेक जण घरी लग्न कार्य आहे म्हणून किंवा काही सणाच्या वेळी दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असतात. या अशा खरेदीच्या वेळी तुम्ही काही काळजी घेतली तर तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकणार आहात.

कोणत्याही प्रसंगी सोने खरेदी करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात म्हणजेच योग्य किंमतीत दागिने खरेदी करू शकता व सोनार तुम्हाला फसवू शकणार नाही. जर तुम्ही दागिने ज्वेलरी च्या दुकानात खरेदी करणार असाल तर तुम्हाला जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे.

त्यासाठी आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सोन्याची किंमत कशी काढली जाते याची माहिती सांगणार आहोत. चला तर मग बघूया…

How to Calculate Gold Jewellery Price

सोन्याची किंमत कशी मोजावी

How to Calculate Gold Jewellery Price



मित्रांनो, सोन्याचा दर हा त्या त्या दागिन्या प्रमाणे वेगवेगळा ठरतो. त्यात तुम्ही निवडलेल्या दागिन्याचे वजन आणि कॅरेटच्या हिशोबाने तो दर वेगवेगळा असतो. पण जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा त्या बिला मध्ये सोनाराने त्या दागिन्याचे कोणते कोणते चार्जेस लावले आहेत ते पहाणे महत्वाचे आहे कारण अनेक वेळा सोनार लोक आपल्याला फसविण्यासाठी बिलामध्ये अनेक प्रकारचे चार्जेस लावतात. पण, माहिती नसल्याने आपल्याला ते कसले चार्जेस आहेत हे कळतही नाही व अश्यावेळी आपल्याला शांत बसावे लागते व त्याने सांगतील ती किंमत आपण देऊन बसतो व फसतो.

मित्रांनो, केंद्र सरकारने व BIS ने दिलेल्या नियमावली नुसार दागिने खरेदी करताना आपल्याला केवळ तीन गोष्टींचे पैसे द्यायचे असतात.

  • पहिली सोन्याच्या दागिन्याचे त्याच्या वजना नुसार किंमत,
  • दुसरा त्या दागिन्याचे मेकिंग चार्ज आणि
  • तिसरा म्हणजे जीएसटी तो देखील फक्त 3 टक्के. म्हणजे खरेदी केलेल्या दागिन्याचे पैसे तुम्ही ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा तुम्हाला जीएसटी फक्त 3 टक्केच द्यावा लागतो.

या तीन चार्जेस शिवाय सोनाराने इतर कोणताही चार्ज आकारल्यास तुम्ही त्याला जाब विचारू शकता. इतर चार्जेस मध्ये काही सोनार लेबर चार्ज, पॉलिश वेट च्या नावावर जास्त चार्जेस लावून आपल्याकडून जास्त पैसे आकारतात. हे चुकीचे आहे. हे पैसे मुळीच द्यायचे नाही. अशा सोनाराची कंझ्यूमर फोरम कडे तुम्ही तक्रारही करू शकता.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचे दागिने हे 24 कॅरेटचे बनत नाहीत. कारण ते खूप मऊ असते. बाजारात उपलब्ध असणारे दागिने हे 22 कॅरेट किंवा 18 कॅरेटचे आसतात. त्यामुळे खरेदीच्या वेळी या गोष्टी कडे लक्ष ठेवावे. शिवाय ज्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करणार असाल त्या दिवशीचा सोन्याचा बाजार भाव काय आहे या कडेही लक्ष ठेवावे. तरच तुम्ही योग्य दरात किंवा योग्य किंमतीत सोने खरेदी करू शकाल.

सोने खरेदी करताना काही दुकानदार मेकिंग चार्जेसचे दर पण वेगवेगळे ठेवतात त्यामुळे तुम्हाला या मेकिंग चार्जेस वर थोडी घासाघीस करता आली तर जरूर करावी. कारण बरेचशे ज्वेलर मेकिंग चार्जेस कमी करतात. आता बघूया की दागिन्यांची किंमत कशी ठरवली जाते. किंवा सोन्याची किंमत कशी कॅल्क्युलेट केली जाते.

मित्रानो, वर सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांची किंमत ही त्याची शुध्दता, त्या दागिन्याचे वजन, त्याची घडणावळ म्हणजे मेकिंग चार्जेस आणि जीएसटी यावर आधारित असते.

मेकिंग चार्जेस (Making Charge)

सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस लावायच्या दोन पद्धती आहे. फ्लॅट रेट ( Flat Rate ) आणि टक्केवारी ( Percentage ). यापैकी कोणतीही एक पद्धत तुमचा सोनार दागिन्यांची किंमत काढण्यासाठी वापरू शकतो.

एकच भाव ( Flat Rate )

उदा. 500/- प्रति ग्रॅम सोने, 700/-, 800/-, 900/-, 1000/-

टक्केवारी ( Percentage )

उदा. एकूण सोन्याच्या वजनाच्या 5%, 6%, 7%, 10%, 12%

दागिन्याची एकूण किंमत = सोन्याचा प्रति ग्रॅम दर × सोन्याच्या दागिन्याचे वजन + मेकिंग चार्जेस + जीएसटी

Total Price of Jewelry = Gold Price Per Gram * Gold Jewelry Weight + Making Charge + 3% GST

उदाहरण

यावर आधारित एक उदाहरण बघूया.

समजा, आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (येथे उदाहरण देताना 24 कॅरेट सोन्याचा भाव नाही दिला कारण 24 कॅरेट चे दागिने बनत नाहीत) तर,

1 ग्रॅम ची किंमत = 54,000 ÷ 10 = 5400 रुपये प्रति ग्रॅम असेल.

आता समजा मी एक सोन्याची अंगठी घेतली आहे व त्याचे वजन 4.5 ग्रॅम आहे, तर 5400 रुपये प्रति ग्रॅम नुसार त्या अंगठीची किंमत ही

4.5 × 5400 = 24,300 रुपये होईल.

आता या दागिन्यावर सोनार मेकिंग चार्जेस लावेल. समजा या अंगठीचे मेकिंग चार्जेस 10 टक्के असेल तर अंगठीची किमती नुसार मेकिंग चार्जेस हे 10℅ मेकिंग चार्जेस = 24300 × 10 ÷ 100 = 2430 रुपये असतील

आता या अंगठीवर 3 टक्के जीएसटी लागेल. अंगठीची किमती नुसार जीएसटी किंमत ही

3℅ GST = 24300 × 3 ÷ 100 = 243 × 3 = 729 रुपये असेल.

आता एकूण अंगठीची किंमत = प्रति ग्रॅम किंमती नुसार सोन्याच्या दागिन्याचे वजन + मेकिंग चार्जेस + जीएसटी

अंगाठूची एकूण किंमत = 24,300 +2430 +729 = 27,459 रुपये होईल.

म्हणजे घेतलेल्या दागिन्याचे फक्त 27,459 रुपये द्यावे लागतील. या शिवाय इतर कोणताही चार्जेस ग्राहकाने ज्वेलर्स लोकांना देऊ नये.

तर मित्रांनो, अजून एक सल्ला द्यायचा आहे तो असा की नेहमी बीआयएस मार्क म्हणजे हॉलमार्क असलेले दागिनेच घ्या. हे दागिने थोड्या अधिक किमतीत आऊ शकतात, पण तुम्ही असे दागिने थोड्याश्या नुकसनासह तुम्ही कधीही एक्सचेंज करू शकता किंवा विकू शकता.

जेव्हा तुम्ही दागिने हे हौस म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून अशा दोन्ही हेतूंनी दागिने खरेदी करता, तेव्हा तुम्ही नेहमी उच्च शुद्धता आणि हॉलमार्क दागिन्यांचाच विचार केला पाहिजे.

मित्रांनो, परत कधी तुम्ही सोने खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल अशी आशा करतो. धन्यवाद!

Tags – Gold Price Calculation Marathi, Gold Making Charge Marathi, Gold Making Charge Calculation Marathi, How to Calculate Gold Jewellery Price Marathi, Making Charge on Gold Calculation Marathi