Marathi

कुलदैवतांच्या टाकांची माहिती | Kuldaivat Tak Information

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी आणखी एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण कुलदैवतांच्या टाकाची माहिती बघणार आहोत.

Kuldaivat Tak

मित्रांनो अगदी प्राचीन काळा पासूनच मनुष्य हा विविध नैसर्गिक शक्तींना देवदेवतांच्या स्वरूपात बघत आलेला आहे. अश्याच देवतांचे मंदिर उभारून आपण त्यांचे पूजन करायला लागलो. त्यातल्या त्यात कुलदैवतांचे स्थान आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी खूप महत्वाचे असते. या कुलदैवतांची पूजा अर्चा आपल्या हातून नित्य नेमाने व्हावी म्हणून कुलदैवतांच्या टाकाची निर्मिती झाली. व आता घराघरात देवतांच्या या टाकाची पूजा केली जाते. या टाकाची संख्या तीन, पाच, सात, नऊ अश्या प्रकारची असावी असे म्हटले जाते. देव घरातील हे टाक म्हणजे त्या त्या कुळाची कुलदैवत किंवा कुलदेवता असतात.

मित्रांनो, कुलदैवत हे नेहमी टाकाच्या स्वरूपातच पुजले पाहिजे असे प्राचीन काळा पासून पूर्वजांकडून आपण ऐकत आलो आहोत. हे सर्व टाक धातू पासून बनवलेले असतात. तसेच चांदीच्या पत्र्यावर कुलदेवतेची प्रतिमा बनवली जाते. पंचकोणी असलेल्या या टाकाच्या मागच्या बाजूला लाख लावून तांब्याची पाठ बसवली जाते.

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की जीवन हे पंच तत्वांशी निगडित असते. आणि याच पंच तत्वाचे प्रतीक म्हणून कुलदैवतांचे टाक हे पंचकोणी बनवले जातात. तसेच पांढरा रंग शीतलता व प्रकाशाचा प्रतिक मानला जातो म्हणून चांदी या पांढऱ्या शुभ्र धातूचा उपयोग कुलदैवतांची प्रतिमा बनवण्यासाठी केला जातो. तसेच तांबडा रंग हा तेजाचा प्रतीक म्हणून तांब्याचा उपयोग हा टाकाच्या पृष्ठभागसाठी केला जातो.

मित्रांनो, देवतांच्या टाकाची संख्या ही विषम स्वरूपात असावी असे मानले जाते. या संख्या प्रमाणेच विविध देवघरात विविध देवतांचे टाक पुजले जातात. पण प्रामुख्याने बऱ्याच देवघरात कुलस्वामी, कुलस्वामिनी, ग्रामदेवता, क्षेत्रपाल, आद्य यक्ष पुरूष इत्यादी देवतांचा समावेश असतो.



प्रत्येकाची कुलस्वामिनी ही वेगवेगळी असते. जसे की भवानी, महालक्ष्मी, रेणुका इत्यादी. मात्र खंडोबा हा कुलस्वामी जवळ जवळ सर्वच घरामध्ये दिसतो. तसेच मरीआई, जानाई, लक्ष्मीआई, काळकाई, यमाई, बोलाई, साती आसरा अश्या विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही घराघरात बघायला मिळतात. तसेच देव घरातील टाकां मध्ये ज्योतिबा, रवळनाथ, वीर, बापदेव अशी अनेक पुरुष दैवतेही बघायला मिळतात. तर काही ठिकाणी एकच देव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. शिवाय काही घरामध्ये पितरांची सुद्धा टाक बनवले हातात. तर काही घरात चेडा, वेताळ, मुंज्या अशा देवतांची ही स्थापना देव घरात केली जाते.

थोडक्यात काय तर तुमचे राहण्याचे ठिकाण, तुमचे जात, विचार, कुळ या सर्वांचा परिणाम देव घरातील टाकांवर पडलेला असतो. त्यामुळे आपल्या घराची, कुळाची माहिती ही प्रत्येकाला असणे गरजेचं राहते. एकाच देवतांच्या जास्त प्रतिमा असू नये असे म्हटले जाते.

कुलदैवतांची टाकाची माहिती

चला तर आता काही कुलदैवतांची टाकाची माहिती जाणून घेऊ या

जानाई – जानाई ही स्त्री दैवत आहे त्यामुळे तिला अधिक कनवाळू मानले जाते. यामुळेच अनेक घरांमध्ये भैरवनाथ ऐवजी जानाईला पुजले जाते. तसेच जानाई व भैरवनाथ हे ग्राम दैवत मानले जातात. काही घरामध्ये भैरवनाथ सुध्दा पुजले जातात. पण ते खूपच कडक देव असल्याने अंगात येणे वगैरे असे प्रकार घडतात. त्यामुळे त्यांचे देव घरात पुजण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. जानाई ही अन्नधान्य प्रदान करणारी देवता आहे. कारण या देवीचे नीट निरीक्षण केले तर तुम्हाला तिच्या एका बाजूला बाजरीचे कणीस व कापलेले पीक दिसते व दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसते. सोबतच सूर्य व चंद्र आणि एक पशु सुद्धा दिसतात. त्याच प्रमाणे देवीच्या हातात घरातील काही भांडी सुद्धा बघायला मिळतात.

थोडक्यात काय तर जानाई ही देवी पुत्र लाभ देणारी, गावाचे रक्षण करणारी, उत्तम दूध दुभते देणारी व संसाराचे रक्षण करणारी अशी देवता आहे. तसेच गावाचे व गावकऱ्यांचे रक्षण करणारी अशी ही ग्राम देवता आहे.

Kuldaivat Devi Ambabai Tak

लक्ष्मीदेवी – ही देवी पलंगावर बसलेली असल्याने बरेच जण या देवीला पलंगावरची देवी असेही म्हणतात. खर तर लक्ष्मी देवी ही स्थिर स्वरूपात असावी म्हणून ती बसलेल्या मुद्रेत आहे. या देवीच्या हातात शस्त्र व सूर्य, चंद्र सुद्धा आहेत म्हणजेच ती दिवस रात्र धन संपत्तीचे रक्षण करणारी आहे. या देवीला कडकलक्ष्मी किंवा मरीआई आई देखील म्हटले जाते. आषाढ महिन्यात देवीला नैवेदय दाखवणे व देवीने सर्व मनोकामना पूर्ण कराव्या अशी प्रार्थना केली जाते.

Kuldaivat khandoba Tak

खंडोबा – खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. तसे पाहिले तर जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे. तर पालीचा खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना असा दर्शवला आहे. परंतु, टाकाचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की टाकात खंडोबा हा सपत्नीक दिसतो. म्हणजे खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी निगडित असणारे दैवत आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या पण तरीही संसार सुखाचा होण्यासाठी पती पत्नीत कसे सामंजस्य हवे हा संदेश इथे दिला जातो. म्हणूनच लग्नानंतर सुखी जीवनासाठी खंडोबाचे दर्शन घेऊन जागरण गोंधळ घातला जातो.

मित्रांनो, खंडोबाच्या टाकत कुत्र्याचे पण खूप महत्व आहे. कुत्रा जसा प्रामाणिक व विश्वासू असतो तसेच पती- पत्नी दोघा मध्ये विश्वास असणे हे खूप महत्वाचे आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घाट बघतो व पुढे पाच दिवस नंतर चंपाषष्ठी ला उठतो. खोबरे व भांडार यांना खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे.

वीर – वीर हे दुसरे कोणी नसून आपआपल्या कुळाचे मुळपुरुष असतात. ज्यांच्या पासून आपल्या वंश कुळाची सुरवात झाली. तेच आपल्या कुळाचे रक्षण व तारण कर्ता असतात. आपल्या कुळातील समस्या हेच वीर दूर करतात.

काळूबाई – या देवीच्या टाक मध्ये फक्त मुखवटा दिसतो आणि मोठा गजरा घातलेला दिसतो.

अन्नपूर्णा – अनेक लोक आपल्या देव्हाऱ्यात हातात पळी असलेली अन्नपूर्णा देवी देखील पूजतात.

यल्लम्मा – काही देव्हाऱ्यात तुम्हाला दहा हात आणि डोक्यामागे चक्र असलेली यल्लम्मा देवी सुद्धा पहायला मिळेल.

ज्योतिबा – खंडोबा प्रमाणेच ज्योतिबा सुद्धा अनेक देव्हाऱ्यात पूजतात. समोरून हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेले ज्योतिबा हे सुद्धा एक कुलदैवत आहेत.

देव घरातील टाकाची काळजी कशी घ्यावी

  • मित्रांनो, आपण देव घरातील देवांना रोज अंघोळ घालतो. म्हणूनच देव घरातील टाक दररोज पाण्याने धुतल्यानंतर त्यांना मऊ सुती कपड्याने कोरडे करून घ्यावे. तसेच गंध लावताना, अक्षदा वाहताना त्या कोरड्या स्वरूपातच वाहाव्यात.
  • तसेच सण, उत्सव च्या वेळी देवांना दही दुधाने अंघोळ घातल्यानंतर पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यावे व कोरड्या मऊ कपड्याने स्वच्छ करावेत.
  • देवाचे टाक हाताळताना ते किनाऱ्याच्या म्हणजेच कोनाच्या भागाने खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण तसे झाल्यास टाकाचा किनाऱ्याचा भागाची पकड सैल होऊ शकते.
  • तसेच देव घरात तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावताना तो टाका पासून जरा लांब लावावा, जेणे करून टाकांवर तेलकट पणाचा काही परिणाम होणार नाही.
  • देवांचे टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारातील पावडर व केमिकल चा वापर करू नये. त्या ऐवजी लिंबू, चिंच किंवा टूथ ब्रश चा वापर करावा.
  • मित्रांनो, देव घरातील टाकाची नीट व्यवस्थित काळजी घेतल्यास ते दीर्घकाळ पर्यंत चांगल्या पद्धतीनं टिकतात.
  • आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील टाक वेळोवेळी तपासून बघितले पाहिजे कारण कोणत्या टाकात पाणी मुरत असेल तर तो टाक वेळीच बदलून घ्यावा. किंवा जर टाक भंगला असेल तर नवीन बनवून घ्यावा.
  • मित्रांनो, जेजुरीच्या मंदिराजवळ अशा अनेक पिढ्या वर्षानुवर्षं टाक बनवण्याचे काम करतात. त्यांच्या कडून किंवा इतर सोनाऱ्या कडूनही तुम्ही देवांचे टाक बनवून घेऊ शकता. टाक बनवून झाल्यावर मुख्य देवतेला दाखवून त्यांची विधिवत पूजा करून मगच ते घरी नेऊन देव घरात बसवावे.
  • मित्रांनो, टाकाच्या स्वरूपात असलेले हे देव खूप महत्व पूर्ण असतात म्हणून त्यांची नीट देखरेख करावी.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण देव घरातील टाक या बद्दल बरीचशी माहिती जाणून घेतली. ही माहिती सर्वां पर्यंत पोहचावी हाच या आजच्या लेखाचा उद्देश आहे. आशा करतो की आजचा लेख तुम्हाला नक्की आवडेल असेल. आणि जर यात काही चुकले असेल तर क्षमस्व.

जर तुम्हाला या लेखामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आमच्या Contact US पेज वर जाऊन तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहचवू शकता.

धन्यवाद!