MarathiMaharashtrian Jewelry (महाराष्ट्रीयन दागिने)

जुने पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने जे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळची कुठली वस्तू असेल तर ती म्हणजे दागिने, आणि स्त्रियांना त्यांच्या शृंगार खुलवण्यासाठी नेहमीच्या दागिन्यां सोबत काही खास दागिने सुद्धा घालावेसे वाटतात. अगदी रोज ऑफिस मध्ये कामाला जाणाऱ्या स्त्रिया देखील सणावाराच्या दिवशी काहीतरी पारंपरिक पोषाख करण्याचे आयोजन करतात. अशा वेळेस त्याच्यासाठी बाजारात वेगवेगळे प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतात.

मागे अमेरिकन डायमंड च्या दागिन्यांची क्रेझ खूप वाढली होती. त्यामुळे सोन्याचे पारंपारिक दागिने ओल्ड फॅशन वाटू लागले होते. पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढलेली दिसते. कारण आज-काल लग्न समारंभात वेस्टर्न कपडया पेक्षा अनेक स्त्रिया नऊवारी किंवा काठपदराच्या साड्यां कडे वळलेल्या दिसतात आणि अशा साड्यांवर पारंपारिक दागिने घालणे अनेक स्त्रिया पसंत करतात. या पारंपारिक दागिन्यां मध्ये काही दागिन्यांचा साज हा तुमची रूप फुलवल्या शिवाय राहणार नाहीत.

List of traditional Maharashtrian jewellery

चला तर मग जाणून घेऊया की ते कोणकोणते पारंपारिक दागिने आहेत जे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायला हवेत.

List of traditional Maharashtrian Jewellery

गळ्यातले दागिने

मित्रांनो, यामध्ये गळ्यालगत चिकटून असणारे, लांब लोंबणारे असे विविध प्रकारचे दागिने असतात. चला तर मग या दागिन्यां बद्दल जाणून घेऊया.



लक्ष्मी हार

लक्ष्मी हार गळ्यात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे. या दागिन्यात सोन्याची पदके बसवलेली असतात. व या पदकांवर लक्ष्मी देवीचे चित्र कोरलेले असते. हा हार सोन्यात बनवलेला असतो. लक्ष्मी हार मध्ये एका सोन्याच्या साखळीत सोन्याची गोल पदके लावलेली असतात. हा हार मुख्य करून नववधू घालताना दिसतात. तसेच काठपदराच्या साड्यांवर हा हार अगदी खुलून दिसतो.

वज्रटिक

वज्रटीक हा दागिना गळ्यालगत घातला जातो. यात जोंधळी मणी घातलेले असतात यात सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसवून मध्ये एखादा पदक किंवा स्टोन लावलेला असतो व खाली सोन्याचे मणी किंवा मोत्याचे मणी झुपकेदार पद्धतीने लावलेले असतात. हा पारंपरिक दागिना पूर्वी जास्त प्रमाणात घालत असे. पण आजही अनेक स्त्रिया हा दागिना आवडीने घालताना दिसतात.

चंद्रहार

हा दागिना म्हणजे एकात एक अडकवलेल्या वळ्याची माळ असते. चंद्रहार हा खूप पूर्वी पासून प्रचलित आहे. हे हार लांबीला खूप जास्त असतात अगदी बेंबी पर्यंत सुद्धा असतात. यात तीन पेक्षा जास्त सरी असतात. महाराष्ट्रातील स्त्रियांचा हा एक पारंपारिक आवडता दागिना आहे. हा दागिना गळ्यात बांधला जातो. मोती किंवा सोन्या पासून हा दागिना बनवला जातो.

तन्मणी

हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो. याच्या मध्यभागी असलेल्या पदकाची वेगवेगळी डिझाईन्स बाजारात बघायला मिळतात. त्यात दोन किंवा तीन सर असतात. हा दागिना मोत्यांच्या मण्यांत विणलेला असतो. पारंपारिक दागिन्यापैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे. व काठपदराच्या साडी वर खूप शोभून दिसणारा हा दागिना आजच्या काळातही खूप प्रसिद्ध आहे.

मोहन माळ

महालक्ष्मीच्या दागिन्यातील हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. मोहन माळ मधल्या मण्यांची वेगळ्या प्रकारची डिझाईन्स बघायला मिळतात. हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो. आजही अनेक स्रिया या दागिन्याला पसंत करतात. हा दागिना गळ्यात घालण्याचा आहे. हा शक्यतो तीन पदरी असतो व कधीकधी यात पदकही घातली जाते. हा दागिना घातल्या वर एक राजेशाही लूक येतो.

जोंधळी पोत

जोंधळी पोत हा महाराष्ट्रात वापरला जाणारा एक पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यात घालण्याचं दागिना आहे. जोंधळ्याचे छोटे छोटे मणी एकत्र करून ही पोत बनवली जाते. छोट्या छोट्या मण्या पासून बनवलेली ही पोत खूप नाजूक आणि सुरेख दिसते. तीन पदरी पासून ते दहा पदरी पर्यंत जोंधळी पोत बनवली जाते.

मंगळसूत्र

मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून एका स्त्री साठी तिचे सौभाग्य अलंकार आहे. मंगळसूत्रात मध्यभागी चार सोन्याचे मणी व दोन छोट्या सोन्याच्या वाट्या बसवलेल्या असतात व बाजूने काळे मणी ओवलेले असतात.

एक पत्नी आयुष्य भर हा दागिना आपल्या गळ्यात ठेवते. मंगळसूत्र फक्त दागिना नसून प्रत्येक स्त्रीसाठी ते तिचे स्त्रीधन असते. मंगळसूत्राला काही ग्रामीण भागात डोरले किंवा गंठण असेही म्हणतात. हे मंगळसूत्र आता विविध प्रकारात व डिझाइन्स मध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

मोती हार

हा गळ्यात घालायचा दागिना आहे. नऊवारी साडी असो किंवा सहावारी साडी असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची साडी असो त्यावर मोत्याचा हार तुमची शोभा नक्की वाढवेल. या हारामुळे तुमच्या सौंदर्याला एक वेगळाच लुक मिळतो. हा हार दोन किंवा तीन सरींचा असतो. कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभात किंवा नेहमीच्या वापरासाठी सुद्धा हा मोत्याचा हार तुम्ही घालू शकता. हा हार दिसायला खूप सुंदर असतो. त्याच्या मध्यभागी हिऱ्याने बनवलेले पेंडेंट लावलेले असते. त्यामुळे ते अजूनच मोहक दिसते. डिझायनर ड्रेस वर सुद्धा हा मोत्यांचा हार शोभून दिसतो.

मोती माळ

मोत्याची माळ ही एक सरीची व पांढऱ्या किंवा मोतीया रंगाची असते. ही माळ तुम्ही कधीही कोणत्याही प्रसंगी घालू शकता. अगदी पंजाबी ड्रेस वर सुद्धा ही माळ खूप नाजूक व उठून दिसते. लहान मुली सुद्धा छोट्याशा फ्रॉक वर मोत्याची माळ घालु शकतात.

चोकर

आजकाल बाजारात चोकर चा ट्रेंड खूप प्रसिद्ध आहे. मोत्यांमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे डिझाइनर चोकर तुम्हाला बाजारात बघायला मिळतील. चोकर हा खास करून मोत्यांचा बनलेला असतो. हा दिसायला खूप अप्रतिम दिसतो. काठापदराच्या साडीवर शिवाय मॉडर्न कपड्यां वरही तुम्ही चोकर वापरू शकता. तुमच्या दागिन्यांच्या कलेक्शन मध्ये चोकर हा दागिना असायलाच हवा, कारण हा स्त्रियांचा आवडता दागिना मानला जातो. चोकर हा गळ्यातील हार अनेक वर्षांपासून वापरला जाणारा दागिना आहे. मोत्या शिवाय आता हा दागिना ऑक्सिडाइज्ड स्वरूपात सुद्धा मिळतो.

चिंचपेटी

चिंचपेटी हा मोत्याचा दागिना गळ्या लगत घातला जातो व हा दागिना गर्दीतही खूप उठून दिसतो. हा दागिना घातल्याने सौंदर्यात अजूनच भर पडते. हा हार शक्यतो नऊवारी साडी वर घातला जातो. एखाद्या काठा पदराच्या साडीवर सोन्याचे मंगळसूत्र व गळ्याला चिटकून असणारी चिंचपेटी फक्त एवढे दागिने घातले तरी सुद्धा खूप पुरेसे असतात. याशिवाय दुसरे दागिने नसतील तरी रूप अधिक खुलून दिसते.

बोरमाळ

बोरांच्या आकारा सारखी दिसणारी ही मण्यांची माळ बोरमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. बोरमाळ हा गळ्यात घालायचा दागिना आहे. बोरमाळ हे सोन्याची किंवा चांदीची अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्वी बायका एक सरीची बोरमाळ घालत असे पण आता बाजारात दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरींची बोरमाळ भेटते. हा दागिना पारंपारिक जरी असला तरी तो तुम्ही कुर्ता, पंजाबी ड्रेस किंवा सहावारी साडी किंवा एखाद्या ट्रेंडी टॉप वर घालू शकता. बोरमाळ हा दागिना कमीत कमी सोन्यात मजबूत बनणारा दागिना आहे. त्यामुळे हा दागिना तुमच्या कडे असायलाच हवा.

ठुशी

ठुशी हा खूप पारंपरिक दागिना आहे, पण तरीही आज प्रत्येक घरात ठुशीच दागिना हा बघायला मिळतो. तुम्ही साडी नेसत असाल किंवा नसाल तरीही तुमच्या कडे ठुशी ही असायला हवी, कारण फक्त साडी, किंवा पैठणी नाही तर एखाद्या सुंदर ड्रेसवर किंवा घागरा-चोळी, अगदी डिझायनर ड्रेस वर सुद्धा ठुशी उठून दिसते.

ठुशी हा दागिना नेहमी एवरग्रीन असा दागिना आहे. सध्या ठुशीचे खूप वेगवेगळे डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत. हा दागिना गळ्या भोवती घातला जातो. ठुशी च्या मध्यभागी कधी कधी एखादे रत्न किंवा सोन्याचे पान देखील लावलेले असते व बाजूने गोल मणी ठासून भरलेली असतात त्यामुळे ती दिसायला खूप सुंदर दिसते.

मण्यांच्या लहान मोठ्या आकारा मुळे हा दागिना खूप नाजूक, उठावदार दिसतो व मोठ्या सोबतच लहान मुलींनाही हा दागिना खूप शोभून दिसतो. याशिवाय हा दागिना घालण्या साठी कोणतीही वयोमर्यादा नाही कारण प्रत्येक मुलीवर तो खुलून दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही समारंभासाठी मग ती स्वतःची असो किंवा इतरांचे दागिन्यांच्या खरेदी मध्ये सर्वात पहिले ठुशी चाच पहिला नंबर असतो. हा दागिना घातल्या वर त्यासोबत इतर कोणताही दागिन्याची गरज पडत नाही. पैठणी कांजीवरम व इतर भरर्जरी साड्यांवर ठुशी हा दागिना घातल्या वर खूप छान दिसतो.

ठुशीची हवी ती डिझाईन तुम्ही तयार करून घेऊ शकता. वजनाला हलका आणि दिसायला भारदस्त असा हा ठुशीचा दागिना इतर सर्व दागिन्यांची कमतरता पूर्ण करून टाकतो. म्हणूनच या दागिन्याला खूप जास्त मागणी आहे.

बकुळी हार

बकुळी हार हा एकापेक्षा जास्त लेयर मध्ये बनवला जातो. बकुळीच्या फुलांच्या आकारा नुसार या हाराची डिझाईन बनवलेली असते. हा दागिना थोडा वजनदार असतो. हा पारंपरिक दागिना पूर्वी पासूनच खूप प्रसिद्ध आहे. हा दागिना तुम्ही लग्न समारंभात किंवा एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमासाठी सुद्धा घालू शकता जो तुम्हाला खूपच सुंदर लुक देईल.

चितांग / चिताक

हा गळ्यालगत घालण्याचा दागिना आहे. हा मुख्यत्वे कर्नाटक मध्ये जास्त प्रसिद्ध आहे. पण आता महाराष्ट्रात देखील याचा वापर जास्त दिसून येतो. यात वेगवेगळे आकार उपलब्द आहेत. शिवाय हा दागिना सोन्यात व चांदीत अश्या दोन्ही प्रकारात मिळतो.

मनचली मंगळसूत्र

हा दागिना गळ्यात घातला जातो. हा मंगळसूत्राचाच एक प्रकार आहे. यात काळ्या मण्यांचे खूप पदर किंवा सरी असतात आणि मधोमध वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स असतात जसे की बेल पानाची डिझाईन किंवा ठुशी सारखी एखादी डिझाईन असते. तुम्हाला जर मंगळसूत्राची एखादी वेगळी डिझाईन घालण्याची इच्छा असेल तर तुम्ही याचा नक्की विचार करू शकता.

चंदन हार

हा गळ्यात घालायचा दागिना आहे. या दागिन्यांची डिझाईन जाळी सारखी असते व मध्ये एक मोठे डिझाईनचे पदक असते. जे दिसायला खूपच सुंदर आणि ट्रेण्डी असते. तुम्हाला जर एखादा मोठा दागिना घालण्याची इच्छा असेल तर हा हार तुमच्यासाठी अगदी योग्य आहे.

राणी हार

महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने मधला खूप प्रसिद्ध हार म्हणजे राणी हार. हा राणी हार अगदी नावा प्रमाणेच आहे म्हणजे हा हार म्हणजे सगळ्या दागिन्यांची राणी आहे. कारण हा हार घातल्या नंतर गळा पूर्ण भरल्या सारखा दिसतो. हा हार दोन किंवा तीन पदरी असतो व त्यावर बारीक अशी डिझाईन केलेली असते. विशेषतः लग्न समारंभात एखाद्या काठपदराच्या साडीवर नुसता राणी हार जरी घातला तरी पुरेसे आहे.

पुतळी चपला हार

हा हाराचा प्रकार अगदी पारंपरिक आहे. हा दागिना गळ्यात घातला जातो. हा दागिना लहान आणि मोठा अशा दोन्ही स्वरूपात मिळतो. यामध्ये मोठी चपटी पाने किंवा पुतळी दोऱ्या मध्ये ओवलेले असतात. या हारा मधील पुतळी किंवा पाने लांब लांब ओवलेले असतात व त्यावर देवीचे चित्र कोरलेले असते. दिसायला हा हार खूप सुंदर दिसतो व तुम्हाला तुमच्या पेहरावा नुसार एक पारंपरिक लुक देतो. शिवाय काही ऐतिहासिक मालिकां मध्ये तुम्ही हा हार नक्की पाहिला असेल.

कोल्हापुरी साज

कोल्हापुरी साज हा गळ्यात घालण्याचा दागिना असून तो लाखे पासून बनवला जातो. लाखेवर सोन्याचा पत्रा मढवला जातो. कोल्हापुरी साज मध्ये मणी आणि विविध प्रकारची पाने सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात. कोल्हापूर कडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरला म्हणून त्याचे नाव ‘कोल्हापुरी साज’ असे पडले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा आकारांचे सोन्याचे लाख भरलेले मणी ओवलेले असतात.

हातातले दागिने

मित्रांनो हातात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे दागिने घातले जातात. जसे की दंडात, मनगटावर, बोटात अशा विविध ठिकाणी आपण दागिने घालतो. चला तर मग जाणून घेऊया हातातले विविध प्रकारचे दागिने –

पाटल्या

बांगडी मधील हा एक प्रकार आहे. पूर्वीच्या काळी हा प्रकार सर्रास वापरला जात असे. या चपट्या प्रकारच्या बांगड्या हिरव्या बांगड्या सोबत घातल्या जातात. या पाटल्यांचे वेगवेगळे डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. या बांगड्या मुळे हात छान भरलेला दिसतो. तसेच हिरव्या बांगड्या मध्ये या पाटल्या घातल्यास त्या अधिक शोभून दिसतात. शुद्ध सोन्या पासून या बांगड्या बनवल्या जातात आजही घरोघरी या प्रकारच्या बांगड्या बघायला मिळतात .

अंगठी

हा दागिना हातांच्या बोटात घालण्याचा दागिना आहे. अंगठी ही वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंत मिळते. जसे की सोन्यात, चांदीत, ऑक्सिडाइज्ड , मोत्यात, प्लॅटिनम, व्हाईट गोल्ड इत्यादी. यात मोत्याची अंगठी बनवताना शक्यतो लहान आकाराचे मोती निवडले जातात.

प्राचीन काळापासून अंगठी घालण्याची रीत आहे. पुरुष असो किंवा स्त्री कोणीही अंगठी घालू शकतात. सोने व मोतीच्या कॉम्बिनेशन मध्ये बनवलेली अंगठी घातल्याने घालणाऱ्या व्यक्तीला एक रॉयल लुक मिळतो. या अंगठ्या वेगवेगळ्या आकारात किंवा डिझाईन्स मध्ये बाजारात उपलब्ध आहेत. तुमचा पेहराव कसाही कोणताही असला तरी तुम्ही त्यावर अंगठी घालू शकतात. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही रोज अंगठी वापरू शकता.

बांगडी

बांगड्या या प्राचीन काळापासून वापरल्या जातात. महाराष्ट्रीयन स्त्रीयांचा हा एक आवडता दागिना आहे. सोन्याच्या व मोत्याच्या बांगड्या या शक्यतो हिरव्या बांगड्या सोबत घातल्या जातात, कारण त्या बांगड्या हिरव्या रंगा सोबत खूप उठून दिसतात. बांगड्या मध्ये बाजारात खूप डिझाइन्स उपलब्ध आहेत. असे एकही घर दिसणार नाही जिथे विविध प्रकारच्या बांगड्या नाहीत. लग्नाच्या प्रसंगी किंवा सणावाराला या सोन्याच्या किंवा मोत्याच्या बांगड्या काठपदराच्या साडी सोबत घालण्यात येतात. शिवाय या बांगड्या हाताची शोभा वाढवतात. आज काल नवीन ट्रेंड नुसार ऑक्सिडाइज्ड बांगड्या सुद्धा भेटतात.

बाजूबंद

बाजूबंद हा दंडा मध्ये घालण्याचा दागिना आहे. सोन्यात मोती जडवून हा दागिना बनवला जातो. मोत्यांचा वापर करून यात नक्षीकाम केलेली असते. मोत्या सोबत यामध्ये माणिक किंवा इतर स्टोन्स देखील वापरलेले किंवा बसवलेले असतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स यामध्ये उपलब्ध आहेत. नऊवारी साडीवर हा दागिना आवर्जून घातला जातो.

बाजूबंद हा स्त्रियांनी हाताच्या दंडावर घालण्याचा एक दागिना आहे. हा बाजूबंद सोने, हिरे, मोती, चांदी अशा विविध प्रकारच्या धातू पासून बनलेला असू शकतो. हा अतिशय सुरेख असा दागिना आहे. मोत्यां मध्ये बनवलेले बाजूबंद जास्त प्रमाणात वापरले जाते. बाजूबंद हा दागिना कितीही जुना वाटत असला तरी त्याची फॅशन कधीही संपलेली नाही. म्हणून तो तुमच्याकडे असायलाच हवा.

तोडे

तोडे हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्या सारखाच असतो. प्युअर सोन्यात म्हणजेच 24 कॅरेटल सोन्या मध्ये हा दागिना बनवला जातो, आणि हा दागिना बांगडयां पेक्षाही दिसायला जाड असतो. शिवाय हिरव्या बांगड्या सोबत तोडे घातल्या वर खूप उठून दिसते. या दागिन्यांवर सुरेख असे नक्षीकाम केलेले असते व ते एका बाजूने लॉक करता येते.

तुम्हाला जर पारंपारिक दागिने घालायला आवडत असेल तर तोडे हे तुमच्याकडे असायला हवे. काठापदराच्या साडीवर हिरव्या बांगड्या सोबत हा दागिना घातल्यावर रूप खुप खुलून दिसते.

शिंदेशाही तोडे

शिंदेशाही तोडे हा बांगडी चा एक प्रकार आहे. हा दागिना खूप जुना व पारंपारिक मानला जातो हा दागिना वजनदार असतो. यांना ॲडजस्ट करण्यासाठी हुक पण लावलेले असते. हा दागिना घातल्या वर एक रॉयल लुक मिळतो.

पिचोडी बांगड्या

हा सुद्धा बांगडीचाच एक प्रकार आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या सोबत हा दागिना घातला जातो. याचे वेगळेपण म्हणचे याची एक बाजू प्लेन असते व दुसऱ्या बाजूला डिझाईन केलेली असते. याला जास्त करून नववधू वापरतात. असा हा पारंपरिक दागिना घातल्या वर हाताला एक वेगळीच शोभा येते.

कानातले दागिने

मित्रांनो कानात दागिने घालणे हे आपल्या मराठी संस्कृतीत खूप शुभ मानले जाते. शिवाय कान टोचल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असेही म्हटले जाते. कानात अनेक प्रकारचे दागिने घातले जातात, चला तर मग त्यांचे विविध प्रकार जाणून घेऊया.

झुबे

झुबे हा कानात घालण्याचा दागिना आहे. कानातल्याचाच हा एक प्रकार आहे. याला झुमके असेही म्हटले जाते. बाजारात विविध प्रकारचे व वेगवेगळे डिझाईनचे झुबे तुम्हाला बघायला मिळतील. झुबेच्या खालची डिझाईन झुंबर सारखी असते. झुबे हे सोन्यात किंवा मोत्यांत सुद्धा मिळतात. काठपदराच्या किंवा नऊवारी साडीवर हे झुबे एक क्लासी लूक देतात, जे तुम्ही कोणतेही कार्यक्रमासाठी घालू शकता अगदी डिझायनर ड्रेस वर सुद्धा हे झुबे खूप खुलून दिसतात.

वेल

हा कानात घालण्याचा दागिना आहे. हा सोन्यात किंवा मोत्यातही बनवलेला असतो. हा वेल एक किंवा दोन सरींचा असू शकतो. त्याचे एक टोक कानातल्यात अडकवायचे असते व दुसरे टोक केसात अडकवायचे असते. कानाची पाळी खाली ओघळू नये म्हणून कानात हा वेल किंवा साखळी घालण्याची पद्धत आहे.

कुडी / कुड्या

हा दागिना कानात घातला जातो. कुड्या हा एक पारंपरिक मराठी दागिना आहे व तो जास्त करून सोन्याच्या किंवा मोत्यांच्या मणांनी बनवलेला असतो. कुड्यांचा आकार शक्यतो गोल व फुलां सारखा असतो. पेशव्यांच्या काळात हा दागिना खूप प्रसिद्ध झाला असे म्हटले जाते. या शिवाय सौभाग्य अलंकार म्हणून शक्यतो सहावारी किंवा नववारी साडी वर हा दागिना घातला जातो.

बुगडी

हा एक पारंपरिक दागिना आहे. याला कानाच्या वरच्या वक्र भागात घातले जाते. बुगडीला जास्त करून मुली लग्नाच्या दिवशी घालतात. मोती आणि सोन्याच्या कॉम्बिनेशन मध्ये बुगडी हा दागिना बनवला जातो. या दागिन्याला दोन्ही बाजूने हुक असते. आताच्या मॉडर्न काळात सुंदर डिझाइन्स मध्ये आणि डायमंड किंवा ऑक्सिडाइज्ड बुगडी सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.

नाकातील दागिने

मित्रांनो, महाराष्ट्रीयन मुलींच्या नाकातही दागिना घातला जातो. ज्यात अनेक प्रकारचे दागिने येतात, जसे की….

नथ

नथ हा एक असा दागिना आहे जो प्रत्येक स्त्रीला हवा हवासा वाटतो. पारंपारिक असला तरीही आज प्रत्येक स्त्री किंवा मुलगी नथ घालत असते.

नथ ही सोन्यात, मोत्यात, चांदीत, किंवा ऑक्सिडाईज स्वरूपात सुद्धा मिळते. पण त्यातल्या त्यात मोत्याची नथ जास्त पसंत केली जाते. जी कोणत्याही काळात खूपच ट्रेंडी दिसते. या शिवाय कोणत्याही स्त्रीचा शृंगार नथी शिवाय अपूर्ण असतो. नऊवारी साडी सोबत किंवा एखाद्या काठापदराच्या साडी वर किंवा आज-काल नवीन फॅशन नुसार जीन्स-टॉप वर सुद्धा नथ घातली जाते. लग्न किंवा पूजा किंवा आजकाल फेट्या सोबत सुद्धा नथ घातली जाते. या नथी मध्ये मध्यभागी काही इतर रंगाचे स्टोन लावलेले असतात.

आताच्या आधुनिक काळात मोत्या सोबतच अनेक प्रकारच्या क्लासिक फॅन्सी डिझाईनर नथ बाजारात उपलब्ध आहे. तुमचे नाक टोचलेले असो किंवा नसो दोन्ही साठी नथ उपलब्ध आहेत. नाक टोचलेले नसल्यास प्रेस नथ किंवा क्लिप असलेली नथ तुम्ही वापरू शकता. अशी ही महाराष्ट्रीयन नथ महिलांचा खूपच महत्त्वाचा आणि आवडीचा दागिना आहे.

पूर्वीच्या काळात नथीला सौभाग्याचे लक्षण समजले जायचे आणि आजही ती परंपरा तशीच चालू आहे. शिवाय मॉडर्न फॅशन म्हणूनही ‘नथीचा नखरा’ हा सोशल मीडिया वर ट्रेंड झाला आहे. अशी ही नथ महाराष्ट्रीयन दागिन्यां मध्ये खूप नावाजलेली आहे. शिवाय नवीन प्रकारच्या नथी या आकाराने व वजनाने हलक्या असतात. लग्नात नवरी साठी तर नथ हा खूप महत्त्वाचा दागिना मानला जातो. लग्न झालेले असो किंवा नसो प्रत्येक मुलीकडे नथ हा दागिना असायलाच हवा आणि तो असतोच.

मोरणी

हा सुद्धा नाकात घालण्याचा छोटासा दागिना आहे. हल्लीच्या काळात नथ न घालता नाजुक असलेला एकच खडा किंवा एकच मोती असलेला नाजुक फुलाच्या आकाराच्या किंवा गोल मोरण्या घातलेल्या दिसतात. या मोरण्या सोन्याच्या किंवा चांदीच्या ही असतात.

पायातील दागिने

मित्रांनो पायात शक्यतो चांदीचे दागिने घातले जातात. कारण चांदी थंड मानली जाते. तिच्या थंडाव्या मुळे ती शरीरातील उष्णता शोषून घेते म्हणून पायात चांदीचे पैंजण, वाळे, जोडवी असे अनेक प्रकारचे दागिने घातले जातात. चला तर मग एकेकाची सविस्तर माहीती बघूया…

जोडवी

हा दागिना पाया घातला जातो. हा एक सौभाग्य अलंकार आहे. लग्न झालेल्या स्त्रिया जोडवी घालतात. जोडवी ही पायात घालत असल्याने ती नेहमी चांदीच्या धातूतच बनवलेली असते. कारण सोन्याचे दागिने पायात घालत नाहीत असे म्हटले जाते. या जोडवीच्या अनेक प्रकारच्या डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत.

पैंजण

हा दागिना पायात घातला जातो. हा एक पदरी दागिना कोणत्याही वयाच्या मुली घालू शकतात. अगदी लहान बाळाला सुद्धा पायात चांदीचे पैंजण घालतात. यात घुंगरू सुद्धा बसवलेली असतात. पूर्वी यामध्ये फक्त घुंगरू व नक्षीकाम केलेले असायचे पण आता यात रंगीत स्टोन्स किंवा डायमंड सुद्धा बघायला मिळतात. स्त्रियांच्या सोळा शृंगार पैकी पैंजण हा एक महत्त्वाचा दागिना आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. पैंजण हा दागिना कधीही जुना किंवा ओल्ड फॅशन झालेला नाही.

मासोळ्या

मासोळ्या या पायांच्या बोटात घालतात. लग्न झालेल्या बायका हा दागिना घालतात. हा एक पारंपरिक दागिना आहे. याला पायाच्या बोटात घालण्यासाठी खाली एक रिंग असते व वरच्या बाजूला माशाच्या आकाराची डिझाईन केलेली असते म्हणूनच याला मासोळ्या असे नाव पडले. हा दागिना चांदीचा बनवलेला असतो. मॉडर्न लूक साठी हा दागिना ऑक्सिडाईज रूपात सुद्ध मिळतो.

तोरडया व वाळे

तोरड्या व वाळे हे आकाराने जाडजुड असतात. वाळे हे चांदी सोबतच तांब्याचे सुध्दा बनवलेले असतात. लहान मुलांच्या पायात असे तांब्याचे वाळे घालण्याची पध्दत आहे.

कमरेचे दागिने

मित्रांनो, पूर्वी कमरेचे दागिने स्त्री व पुरूष दोघेही घालत. त्या काळी कंबर पट्टा, मेखला, साखळया, करकोटा, हे दागिने वापरत. हे दागिने शक्यतो चांदीची असतात.

कबंर पट्टा

कंबर पट्टा हा दागिन्यां मधील अतिशय जुना पारंपरिक दागिना आहे. राजघराण्यातील स्रिया नऊवारी साड्यांवर कबंर पट्टा लावत असे. हा कंबर पट्टा लावल्यावर अगदी रुबाबदार वाटत. तसेच हा पट्टा ऍक्युप्रेशरचे सुद्धा काम करतो त्यामुळे पाठदुखी सारख्या आजार कमी होतात. या कंबर पटटयाच्या मध्यभागी शोभे साठी खडे लावलेले असतात व बाजूने सोन्याची किंवा चांदीची जाड पट्टी असते.

मेखला

हा दागिना कमरेच्या एका बाजुला लावला जाणारा दागिना आहे. यात साखळी असते ज्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले असते. या दागिन्याला अडकवण्यासाठी दोन टोके असतात. एक टोक पोटाच्या बाजुला अडकवतात व दुसरे टोक पाठीच्या बाजूला अडकवले जाते.

छल्ला

हा कमरेवर लावायचा दागिना आहे. हा दागिना भारतात खुप प्रसिध्द आहे. भारतातील अनेक प्रदेशां मध्ये हा दागिना वापरला जातो. हा दागिना चांदीचा असतो. पण आजकाल ऑक्सिडाईज छल्ला सुद्धा मिळतो. या मध्ये वरच्या बाजुस नक्षीदार प्लेट असते. व पाठी मागच्या बाजूस अडकविण्यासाठी हुक केलेले असते. या दागिन्याला अजून सुंदर बनवण्यासाठी घुंगरू सुद्धा लावले जातात. हा दागिना शक्यतो साडीवर घातला जातो.

तर मित्रांनो अशा या दागिन्यांची ओढ प्रत्येक स्त्रीला असते. त्यामुळे हे दागिने तुमच्या कडे नसतील तर ते अवश्य घ्या. कारण दागिन्यांची फॅशन कधीही जुनी होत नसते, जुनी झाली तरी ती परत फिरून येत असते. जसे की हे आपले पारंपारीक दागिने ज्यांची तरुण स्त्रियां मध्ये क्रेझ वाढलेली दिसून येते. अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या आपल्या पारंपारीक दागिन्या बद्दल आज आपण माहिती बघितली. हा लेख वाचून जर तुमच्या कडे यापैकी एखादा दागिना नसेल तर तुम्ही तो नक्की घ्याल अशी आशा करतो.

धन्यवाद